आनंदाचे डोही आनंद तरंग
तशी अगदी पहाटेपासूनच सगळ्यांची लगबग सुरू होते. आज सगळी आपलीच मंडळी येणार असतात.सर्व योजना आखलेली चार कुटुंबे, दोन दिवस आधीपासूनच गावात मुक्कामास असतात.ज्या पवित्र भूमीत आपले कुलदैवत आणि देवता आहेत, त्याच ठिकाणी आपल्या कुळाच्या सर्व लोकांनी एकत्र एक दिवस व्यतीत करायचा असा मनसुबा असतो.सर्व सुरळीत पार पडावे ह्यासाठी प्रत्येक आयोजक मेहनत घेत असतो.
ठरल्या दिवशी भल्या सकाळी, श्रीकुसुमेश्र्वर आणि आई महालक्ष्मी ह्यांची अभिषेक पूजा घातली जाते.प्रत्येकाला प्रसाद म्हणून आंबा वडी देण्यात येणार असते.समस्त सहस्त्रबुध्दे कुळात सुख,शांती ,आरोग्य,समृध्दी ,भरभराट
नांदू दे असा आशीर्वाद मागितला जातो .
साडे सात ,आठ पासून मंडळी, एकेक करून जमू लागतात.कोणी रत्नागिरी येथे मुक्काम केलेला असतो तर कुणी गणपतीपुळ्याला…दोन्ही कडून कोतवडे गाव जवळच असते.
आठ, साडेआठ पर्यंत एकेक गाडी,रिक्षा भरून लोक येऊ लागतात.छान सजवलेली स्वागत कमान ,बाजूला सुबक रेखीलेली रांगोळी (स.माहेरवाशीण आणि जावयाची कला),एका बाजूला टेबल टाकून नोंदणी करणारी मंडळी आणि छान साड्या , झब्बे घालून प्रसन्न मुद्रेने स्वागत करणारे आयोजक आणि अन्य येणारी मंडळी….वातावरण आपसूकच चैतन्यमय झालेले असते.
खरेतर, खूप जणांनी एकमेकाला कधी पाहिलेलेही नसते पण कुठेच अनोळखी भाव नसतात.आपल्या घरातील कार्याला जमलेली मंडळी जशी वावरतात तितका सहजपणा सर्वात असतो.
मस्त गरमगरम चविष्ट,लुसलुशीत इडली,चटणी ,सांबार,चहा,कॉफी ,जुजबी गप्पा अशा सकाळच्या रम्य वातावरणात सारे रमून जातात… सर्वांची रसना तृप्त करणारे पण, कोतवडे गावातील सहस्रबुद्धेच असतात!
तुम्ही म्हणाल ,कसले वर्णन चालू आहे हे सगळे? तर ही प्रस्तावना आहे, तीस ऑक्टोबर २०२२ रोजी कोतवड्याला झालेल्या एक दिवसीय सहस्रबुध्दे कुलसंमेलनाची..
यंदा आम्ही दोघे आणि आमचा धाकटा लेक असे उपस्थित राहिलो होतो.मागील वर्षी घरातील काही कारणामुळे जमले नव्हते.
कुलसंमेलन का करायचे ? काय करायचे आहे सगळ्यांनी एकत्र येऊन? असेही काही अनुभव आले असे आयोजकांच्या बोलण्यातून समजले. परंतु ज्या ऋषींच्या कुळात आपण जन्मलो,
त्या कुळातील अनेक कुटुंबे एकत्र आली तर कुटुंबासाठी आणि समाजासाठी काही विधायक कार्य करता येऊ शकते ,एकी हेच बळ हे तत्त्व सांभाळून आपल्याच लोकांना आधार होऊ शकतो असे अनेक उद्देश आहेत ह्यामागे असे वाटते.
आपल्या कुटुंबातील कित्येक जण उच्च विद्या विभूषित ,अनेक मोठ्या पदांवर कार्यरत आहेत हे समजल्यावर अभिमान वाटतो आणि नवीन पिढीला स्फूर्ती मिळते.
साडे नऊ उलटून गेले आणि थोड्याच वेळात कार्यक्रमाची सूत्रे हातात घेतली गेली. ओम नमोजी आद्याच्या गायनाने आणि द्वीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.एबीपी माझाच्या प्रमुख वार्ताहर,ठाण्याच्या सौ.भारती सहस्रबुध्दे आणि चिपळूण येथील परशुराम संस्थान चे विश्वस्त श्री.अभय सहस्रबुध्दे असे दोघेही अनुक्रमे उद्घाटक आणि अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
खरेतर तिथे आलेला प्रत्येक जण आपल्या आपल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेला असाच होता.
संमेलनाचे उद्घाटन झाल्यावर काही वेगळे कार्य केलेल्या व्यक्तींचे सत्कार करण्यात आले.त्यांना मानपत्र,गुलाब पुष्प देण्यात आले.साहित्य ,शिक्षण,वैद्यकीय क्षेत्र,संगीत, विज्ञान ,व्यवसाय,गिर्यारोहण,
पत्रकारिता,राजकारण किती किती क्षेत्रे,सगळीकडे उल्लेखनीय वावर !
छोट्या मुलाखती मधून त्या त्या व्यक्तींचे कार्य अधिक उलगडत नेले गेले.
तदनंतर,
छोट्या पडद्यावर ,अभ्यासपूर्ण असा सहस्रबुध्दे कुळाचा इतिहास दाखवण्यात आला.
एकंदरीत उत्साहात सर्व काही पार पडत होते .नंतर आलेल्या सर्वांनी आपली आणि आपल्या कुटुंबाची ओळख करून इतरांना करून दिली.खूप नवीन माहिती ,नवीन ओळखी झाल्या. काही अपेक्षित लोक अचानक आलेल्या अडचणींमुळे येऊ शकले नाहीत तर एक दोन कुटुंबे लेकी,जावई ,सूना ,मुले सर्वानसह उपस्थित होती.
मागील वर्षी पेक्षा यंदा खूप अपरिचित, नवीन ,कुटुंबे संमेलनाला उपस्थित राहिली असे सांगितले गेले.ही खूप सकारात्मक गोष्ट आहे.तरुण पिढी ही थोड्या प्रमाणात का होईना पण सहभागी होती.
जिलेबी मठ्ठा,उकडीचे मोदक असलेल्या सुग्रास जेवणाची मजा, थोड्या ओळखी झाल्याने ,गप्पा मारत अजूनच वाढली.
जेवणानंतर कोतवड्यातील दशावतारी कलाकारांचा नाट्यनृत्य कार्यक्रम होता.नवीन काही बघायला छान वाटले.
मग उत्तम हार्मोनियम वादन ,त्याला तशीच तबल्याची साथ …दोघेही
सहस्रबुध्देच…आपल्याच लोकांसमोर कला सादर करताना त्यांनाही किती छान वाटले असेल… एव्हाना सूर्य मावळतीकडे झुकू लागला होता.
हळूहळू परतीचे वेध सर्वांना लागायला लागले होते. काहींना रात्रीच्या गाड्या रत्नागिरीहून पकडायच्या होत्या…
एका ताईच्या स्वलिखित कविता वाचन आणि छोट्या लेकिंच्या योगासन प्रात्यक्षिक ह्यांनी मनोरंजनाचे सत्र संपले.
पसायदानाने सांगता झाली आणि बटाटेवडे ,चहा घेऊन पुढच्या वर्षी नक्की भेटू असे म्हणून मंडळी पांगली.
सर्वांना एकत्र आणणे ,त्यांना संमेलनाचे , कुलवृत्तान्तचे महत्व ,माहिती पटवून देणे ,स्वतः चारशे किमी वरून कधी येऊन जाऊन सर्व नियोजन उत्तम करणे आणि इतर अनेक कामे शिवाय स्वत:चा कामाचा व्याप सांभाळून हे कदापि सोपे नाही.
त्या सर्वासाठी आयोजक मंडळींना मनापासून धन्यवाद..
मला वैयक्तिक असे वाटले की ,आपण प्रत्येक जण स्थानिक पातळीवर एकत्र आलो तर ह्या सर्व कार्यकारिणी चे काम सोपे होईल.कदाचित तसे कुठे कुठे असेलही ..
एकमेकांच्या उद्योग,व्यवसायातील अनुभवाचा फायदा घेता येईल.एखाद्या अपरिचित गावात आपल्याच बंधूंची ,भगिनीची मदत घेता येईल.पण ह्या साठी परस्पर परिचय आणि जवळीक महत्वाची आणि ती साधेल अशा मेळाव्यानी….असे आव्हान केले गेले की , कार्य करायचे तर अर्थसंचय हवाच…तर
प्रत्येकाने अगदी तीन चार हजाराचे contribution दिले तरी मोठा संचय होईल आणि त्याच्या व्याजावर आपल्याच बांधवांना मदत करू शकू…
आवडली ही कल्पना!
खूप काही करणे शक्य आहे परंतु मनात कोणताही गैरभाव न ठेवता समस्त
कुलवासी एकत्र आले तर….!
काम करणाऱ्यांना मदतीचा हात दिला तर ते अजून सुलभ होईल.
पुढील वर्षीच्या मेळाव्याला अजून बहर येईल.प्रत्येक गावच्या टीमला मनोरंजन करता येईल..ड्रेस कोड ठरवता येईल .एकत्र सहल नियोजन करता येईल…
माहेरवाशिणीनी पण ह्यात उत्साहाने भाग घ्यावाच.
अर्थात ही सगळी माझी वैयक्तिक मते आहेत.
माझ्या पातळीवर मी प्रयत्न करेनच हे नक्की.
चूक भूल द्यावी घ्यावी.
सौ.गौरी विनय सहस्रबुध्दे
सांगली ,महाराष्ट्र
दि.१ नोव्हेंबर २०२२