नमस्कार !! सहस्रबुद्धे कुटुंबात आपले स्वागत आहे.

आपल्या वेबसाईट चा उद्देश आणि, सर्वप्रथम, २०१९-२१ ह्या काळात झालेल्या कार्याचा आढावा
२१ व्या शतकाच्या सुरुवातीस (२००३ साली) सहस्रबुद्धे कुलसंमेलन पार पडलं. दरम्यानच्या काळात कार्यमग्नतेमुळे जनसंपर्काच काम थांबलं. ह्या कार्याचा पुनःश्च श्रीगणेशा करण्याच्या दृष्टीने , डिसेंबर २०१९ साली श्री राहुल आणि श्री अभिजित ह्यांची भेट झाली. एकंदरच ह्या कार्याची निकड लक्षात घेत आणि येणाऱ्या अडचणींचा अंदाज घेत पुढील वाटचाल ठरविण्यात आली. प्रत्येक महिन्यात एक अशा प्रत्यक्ष भेटी घेऊन, नवीन सदस्यांशी संवाद साधणे, कुलग्रंथाचं नूतनीकरण करणे असे निर्णय झाले, मागच्या कुलवृत्तांतातील माहेरवाशिणींचे अमूल्य योगदान बघता त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रोत्साहन देणे हे आणि असे अनेक निर्णय झाले. बघता बघता भेटी होऊ लागल्या, नवीन सदस्य मिळू लागले आणि हे लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरले.
१९९८ च्या तुलनेत संपर्काची साधने जरी वाढलेली असली तरी सहस्रबुद्धे कुलबंधू आणि भगिनी जगभर पसरलेले असल्याने कार्याची व्याप्ती खूप मोठी होती. सबब प्रांतवार प्रतिनिधी नेमावेत असे ठरले. ह्यातूनच जन्म झाला कार्यकारिणीचा. सुरुवातीला पुणे , मुंबई, नाशिक ,नागपूर , सांगली ह्यातील ७ सद्सस्यांची निवड करण्यात आली. (ह्यांची विस्तृत माहिती शेवटी वाचा) कार्यकारिणीच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलो. आज २०२१ मध्ये अवघ्या दिड वर्षात २ व्यक्तींपासून सुरु झालेला हा प्रवास १००० कुलबंधू आणि भगिनी ह्यांच्याहि पुढे गेलेला आहे. जगातील प्रत्येक कुलबंधू आणि भगिनींपर्यंत पोहोचण्याचा आपला मानस आहे. पल्ला मोठा हि आहे आणि लांबही, आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण तो लवकरच गाठू.
१९९८ साली सहस्रबुद्धे कुलवृत्तांत प्रसिद्ध झाला. स्व. श्रीमती सरला सहस्रबुद्धे ह्यांच्या प्रेरणेतून आणि इतर अनेकांच्या अपार कष्टातून तयार झालेला हा कुलवृत्तांत अनेकांच्या कडे असेल. परंतु संपर्काची तोकडी साधने आणि काही प्रमाणात काही सदस्यांनी दाखवलेली उदासीनता ह्यामुळे तो सर्वांपर्यंत पोहोचू शकला नाही. दरम्यानच्या काळातील झालेला सहस्रबुद्धे कुटुंबीयांचा विस्तार लक्षात घेता आणि सतत अद्ययावत होणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात आपला कुलवृत्तांतही सहजगत्या अद्ययावत करता यावा, तसेच हे काम कुठूनही कोणीही करू शकेल आणि वाचू शकेल ह्याकरीता कुलवृत्तांताचे नूतनीकरण आणि संगणकीकरण करण्याचा निर्णय झाला. ह्याचाच भाग म्हणून ही वेबसाईट आपण बघत आहोत.

    Thumb

    कार्यकारिणी मंङळ

    अभिजीत सहस्रबुद्धे, पुणे
    अभिजीत सहस्रबुद्धे

    पुणे

    राहुल सहस्रबुद्धे,पुणे
    राहुल सहस्रबुद्धे

    पुणे

    विनायक सहस्रबुद्धे, मुंबई
    विनायक सहस्रबुद्धे

    मुंबई

    मकरंद सहस्रबुद्धे, पुणे
    मकरंद सहस्रबुद्धे

    पुणे

    भूषण सहस्रबुद्धे, नागपूर
    भूषण सहस्रबुद्धे

    नागपूर

    विनय सहस्रबुद्धे, सांगली
    विनय सहस्रबुद्धे

    सांगली

    विकास सहस्रबुद्धे, मुंबई.
    विकास सहस्रबुद्धे

    मुंबई

    संदिप सहस्रबुद्धे, नाशिक
    संदिप सहस्रबुद्धे

    नाशिक

    नितीन सहस्रबुद्धे, पुणे
    नितीन सहस्रबुद्धे

    पुणे

    क्षिप्रा सहस्रबुद्धे नाशिक
    क्षिप्रा सहस्रबुद्धे

    नाशिक

    प्रास्ताविक:

    समग्र चित्तपावन सहस्रबुद्धे कुलग्रंथ (शांडिल्य व नित्युंदन गोत्री सहस्रबुद्धे) आज प्रसिद्ध करताना आम्हास विशेष आनंद व समाधान होत आहे. दोन गोत्रीयांचा एकत्र प्रसिद्ध होणारा कदाचित हा पहिलाच कुलगंथ असावा. या ग्रंथाची मूळ कल्पना श्री. गणेश दिनकर सहस्रबुद्धे, हल्ली मुक्काम बीदर, कर्नाटक राज्य, यांची. श्री. गणेशपंतांचे वडील कै. दिनकरराव सहस्रबुद्धे जळगाव जिल्ह्यातील चोपडे गावी वकिलीचा व्यवसाय करीत असत. त्यांच्या अकाली निधनामुळे, मोठ्या प्रपंचाचा भार वाहाणे कठीण होऊ लागल्यामुळे गणेशपंत बालवयातच शिक्षणासाठी पुणे येथील त्या वेळच्या अनाथ विद्यार्थिगृहात दाखल झाले. हसतमुख, चुणचुणीत, बोलण्याचालण्यात गोडवा असणारा व कोणत्याही कामास आपण होऊन पुढे येणारा हा विद्यार्थी, थोड्याच दिवसात अ. वि. गृहाचे त्या वेळचे मुख्य संचालक, एक प्रसिद्ध विद्वान व समालोचक, (कै.) डॉ. ग. श्री. खैर यांचा आवडता बनला, त्यांच्या अभ्यासिकेत घुटमळू लागला. एकदा असाच परीक्षणार्थ एक कुलवृत्तान्त त्यांच्याकडे आला असताना, कुलग्रंथ म्हणजे काय असतो इत्यादी चौकशा हा मुलगा करू लागला. त्याची शंका थोडक्यात निरसन करून शेवटी ते म्हणाले, ‘‘तू मोठा होशील ना, तेव्हा तूही असाच सहस्रबुद्धे कुलवृत्तान्त लिही.” बालमनावर उमटलेली ही रेषा कधीच बुजली नाही. शिक्षण पूर्ण झाल्यावर शासनाच्या नोकरीत प्रवेश करून, ३५ वर्षांच्या सेवेनंतर आकाशवाणी, नवी दिल्ली, येथील समाचार प्रसार विभागात वरिष्ठ प्रशासक, या पदावरून १९९१ साली ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर, बालपणी मनात खोल रुजलेला कुलग्रंथाचा विचार उफाळला व सहस्रबुद्धे कुलग्रंथ विषयाच्या कामास सुरुवात करण्याचा मनोदय व्यक्त करून त्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू झाली.

    कार्याची जडणघडण:

    अशा कामास मोठा जनसंपर्क व भरपूर निधीची आवश्यकता असते, ही कल्पना, प्रदीर्घ शासकीय सेवेत असल्याने त्यांच्या प्रथम लक्षात आली. पैसे कसे उभे करावेत, या विचारात असताना कर्नाटक राज्यातील बीदर गावी शीख समाजाने चालविलेल्या एका शिक्षणसंस्थेची नोकरी त्यांना सांगून आली व पैशाची प्राथमिक व्यवस्था करण्याचा मार्ग मोकळा झाला. परंतु त्याच वेळी एक वेगळीच अडचण उभी राहिली. नव्या नोकरीतील नियमानुसार ‘आपण कोणत्याही राजकीय व सामाजिक कार्यात भाग घेणार नाही,’ अशी अट त्यांना पत्करावी लागली. एकच मार्ग मोकळा होता आणि तो म्हणजे आपल्या पत्नीच्या नावे हा उपक्रम चालू करायचा. परिणाम असा झाला की, भारतभर अनेक सहस्रबुद्धे कुटुंबीयांना ‘सरला’ या सहीची पत्रावर पत्रे येऊ लागली. सर्वसाधारण मराठी परंपरेस सोडून केवळ सरला या एकेरी सहीची पत्रे अनेकांच्या मनात संशयाची जळमटे निर्माण करून गेली.
    सौ. सरला सहस्रबुद्धे यांनी बरीच वर्षे आंध्र प्रदेशात वास्तव्य केलेले होते. आंध्र, तामिळनाडू आदी दक्षिण भारतातील स्त्रिया आपल्या नावाचा उल्लेख एकेरी शब्दात करतात. मराठी स्त्रियांप्रमाणे ‘सौभाग्यवती, श्रीमती’ अशी विशेषणे लावून करीत नाहीत. या दाक्षिणात्य पद्धतीस अनुसरूनच फक्त सरला या एकेरी सहीची पत्रे कुलबंधूंना जाऊ लागली. या पद्धतीमुळे सुरुवातीच्या काळात श्री. गणेशपंत यांच्या कार्याकडे काहीशा संशयित दृष्टीने पाहिले गेले व काही वेळा काही अपमानित करणारे शब्दही त्यांना ऐकावे लागले, असे काही किस्से ते कधीकधी सांगतात. पैशाची तात्पुरती काळजी कमी झाली व जनसंपर्काच्या मार्गाचा विचार सुरू झाला. सहस्रबुद्धे कुटुंबीयांचे पत्ते माहीत असणे, ही एक अगदी प्राथमिक गरज होती. बीदरसारख्या कर्नाटक राज्यातील एका आडगावी राहून ते करणे जवळजवळ अशक्यच होते. यासाठी त्यांनी एक काहीशी वेगळी कार्यपद्धती अवलंबिली. १९९१ ते १९९३ या दोन वर्षांत, या जोडप्याने देशभरातील लहानमोठ्या गावांतील मोठ्या बँका, शिक्षणसंस्था, शासकीय कचेऱ्या, येथील प्रमुखांना, `तुमच्याकडे कोणी सहस्रबुद्धे आडनावाचे कर्मचारी-विद्यार्थी असतील तर त्यांची नावे पत्ते कळविण्याची’ विनंती करणारी जवळजवळ पाच/सहा हजार पत्रे लिहिली. गावोगावचे पत्ते मिळविण्याचे जणू काही एक अभियानच श्री. गणेशपंत यांनी सुरू केले. या सर्व खटपटींची परिणती अशी झाली की, श्री. गणेशपंतांच्या संग्रही भारत व भारताबाहेरील गावोगाव पसरलेल्या सहस्रबुद्धे कुटुंबीयांचे जवळजवळ एक हजार पत्ते आले.
    १९९३ पासून या कार्यास एक प्रातिनिधिक स्वरूप आले. मुंबई, पुणे, नागपूर, सांगली इत्यादी मोठ्या शहरांत सहस्रबुद्धे कुटुंबीयांच्या सभा, स्थानिक कुटुंबीयांच्या सहकार्याने होऊ लागल्या. त्यातून बीदर, मुंबई, पुणे व नागपूर या चार प्रमुख शहरी या कार्यासाठी चार शाखांची रीतसर स्थापना झाली. या शाखांच्या कार्याची जबाबदारी अनुक्रमे बीदर येथे सौ. सरलाबाई, मुंबईस श्री. चिं. पु. सहस्रबुद्धे, पुण्यास डॉ. य. शि. सहस्रबुद्धे व नागपूर येथे श्री. प. पु. सहस्रबुद्धे यांनी पत्करली. पुणे व मुंबई या शाखांसाठी छोट्याछोट्या मार्गदर्शक समित्यांची निर्मिती झाली. या शाखांकडे स्थानिक सहस्रबुद्धे बि. कुटुंबीयांशी संपर्क साधून माहितीपत्रके भरून घेणे हे कार्य प्रामुख्याने होते. माहितीपत्रकासहित कोणी ऐच्छिक वर्गणी दिली तर ती शाखांकडेच ठेवून त्यातून पत्रव्यवहारानिमित्त, सभा भरविण्यानिमित्त होणारा खर्च, त्या त्या शाखांनी भागवावा, असे आपोआपच ठरत गेले. सर्व शाखांकडून माहितीपत्रके जमा करण्याचे काम बरेचसे फलदायी ठरले. बीदरहून २५०, मुंबईहून १५०, पुणे येथून २५० व नागपूर भागातून शंभराच्यावर माहितीपत्रके जमा झाली व जवळजवळ ६१० माहितीपत्रके जमा होऊन या कार्याची उभारणी झाली. यासंबंधात आणखी एका मदतीचा उल्लेख आवश्यक आहे. मध्यंतरी नागपूर शाखेचे श्री. प. पु. सहस्रबुद्धे हे घरगुती अडचणींमुळे या कामास फारसा वेळ देऊ शकत नाहीत, हे पाहाताच त्यांचे बंधू, अकोला येथील श्री. यशवंत रघुनाथ सहस्रबुद्धे यांनी विदर्भ, खानदेश व मराठवाडा येथून माहितीपत्रके जमविण्याची जबाबदारी पत्करली. गावोगाव फिरून जवळजवळ शंभरावर माहितीपत्रके त्यांनी एकट्याने जमविली.
    जवळजवळ एक हजार कुटुंबीयांशी संपर्क साधल्यानंतर त्यापैकी फक्त ६५ टक्के कुटुंबीयांनीच पत्रके पाठविली, ही गोष्ट संपूर्ण सहकार्याच्या कल्पनेशी सकृतदर्शनी सुसंगत दिसत नाही. परंतु त्याचवेळी हेही लक्षात ठेवणे जरूर आहे की, कालमानानुसार वडील-मुलगा, भाऊ-भाऊ वेगवेगळ्या ठिकाणी राहात असल्यामुळे पत्ते जरी स्वतंत्र असले तरी वंशवृक्षबांधणीच्या संदर्भात ६५ टक्के कुटुंबीयांची माहिती बरीचशी प्रातिनिधिक समजावी लागेल. अजूनही श्री. गणेशपंतांच्या जाळ्यातून काही कुटुंबे सुटलेली असतीलही. परंतु अशा कार्यात कोठेतरी थांबावे लागते, या दृष्टीने ६५० माहितीपत्रकांच्या अभ्यासातूनच हा ग्रंथ सादर होत आहे.
    अशा स्वरूपाच्या कार्यात सर्वसाधारण जनमानसात उदासीनता असते, हे लक्षात आणून प्रत्येक कुटुंबाशी वारंवार संपर्क साधण्यासाठी सौ. सरला सहस्रबुद्धे यांनी आपल्या कुलबंधूंना राखीपौर्णिमेनिमित्त पोस्टाने रक्षाबंधनाचा कार्यक्रम १९९३ ते १९९६ पर्यंत नियमाने अमलात आणला. प्रत्येक राखीपौर्णिमेस एका नवीनच झालेल्या कुटुंब भगिनीकडून न विसरता राखी येते, या भावनिक सुखद अनुभवातून एक प्रकारची जवळीक निर्माण झाली व काही गैरसमजुतींवर आधारलेला संशय निवळला. राखीबरोबरच त्या त्या वर्षात कुलवृत्तान्ताच्या कामाचा आढावा आणि यानिमित्ताने होत असलेल्या जमा-खर्चाचा ढोबळ तपशील घरोघरी पोहोचू लागला. काही कारणाने १९९६९७ मध्ये राखी का आली नाही, याची चौकशी होऊ लागली. यजमानांच्या जनसंपर्काचा भाग त्यांनी यानिमित्ताने फार समर्थपणे सांभाळला व या कार्यातील एक प्रकारच्या पारदर्शकतेचा प्रत्ययही आणून दिला. कुलग्रंथाच्या अभ्यासासाठी माहितीपत्रके जमविताना सर्वच कार्यकत्र्यांना कमी-अधिक प्रमाणात अनेक सामाजिक कल्पनांचे व असंख्य मनुष्यस्वभावांचे दर्शन झाले. प्रत्येकाच्या अनुभवाला आलेल्या प्रश्नांचे विश्लेषण केले तर (१) कशासाठी हे किचकट काम तुम्ही हातात घेतले आहे? (२) याचा काही उपयोग आहे का? (३) तुम्हाला आणखी एखादा चांगला उद्योग सुचत नाही का (४) एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर या निरुपयोगी कामात तुमचे आणि आमचे आयुष्य का वाया घालवता? (५) पैसे मिळविण्यासाठी आणखी दुसरा एखादा उद्योग का करीत नाही, इत्यादी अनेक प्रकारच्या प्रश्नांना सामोरे जावे लागले. एकएक माहितीपत्रक जमविण्यासाठी घरोघरी चार-सहा हेलपाटे घालावे लागले. माणुसकीचे विविध अनुभव प्रत्ययास आले. कोठे एखाद्या भिक्षेकऱ्याप्रमाणे वागणूक अनुभवावी लागली, तर काही ठिकाणी माहितीपत्रकासोबत शंभर रुपयांची नोट ठेवून, अत्यंत आदरभावनेने खाली वाकून पायाला हात लावून नमस्कार करून घेण्याचा संकोचून टाकणारा अनुभवही आला. दुर्दैवाने हातगाडी ओढून उदरनिर्वाह करणाऱ्या एका कुलबंधूने माहितीपत्रकाबरोबर ‘या कार्यासाठी पैसे खरोखरच द्यावयास पाहिजेत, पण काय करू? आज फक्त दहा रुपयेच जमले, ते तरी तुम्ही घ्या’, असे म्हटले. कार्यकत्र्याच्या डोळ्यात पाणी आणणारा असा अनुभवही मिळाला. हा ग्रंथ शेवटी अशा चिकाटीने व अथक श्रम करून माहितीपत्रके जमविणाऱ्या कार्यकत्र्यांच्या श्रमाचेच चीज म्हणावे लागेल.
    सहस्रबुद्धे कुलग्रंथनिर्मितीचे यापूर्वी तीन-चार प्रयत्न झालेले दिसतात. ‘वाईकर सहस्रबुद्धे’ नावाने शांडिल्य गोत्री सहस्रबुद्धे यांचा पहिला कुलग्रंथ कै. भालचंद्र कृष्ण यांनी १९१७ साली लिहिला. याच ग्रंथाची दुसरी आवृत्ती (१९४२ ते १९६३) कै. धुंडीराज गणेश यांनी लिहिली. तर १७५० ते १९९० या काळासाठी सुधारून अद्ययावत आवृत्ती कै. बाळकृष्ण नारायण व कै. श्रीराम अच्युत यांनी लिहिली. ही तिसरी आवृत्ती श्रीरामांच्या पत्नी जयश्री सहस्रबुद्धे यांनी प्रकाशित केली. वाईकर सहस्रबुद्धे हे घराणे कोतवडेकर सहस्रबुद्धे यांच्या अनेक घराण्यांपैकी एक घराणे आहे. समग्र सहसबुद्धे यांचा तो कुलग्रंथ नाही. परंतु एका घराण्याने सातत्याने तो प्रकाशित केला, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. सदर ग्रंथानिमित्त नागपूर येथील सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारून समग्र ग्रंथाची रूपरेषा श्रीमती जयश्रीतार्इंनी ऐकून समाधान व्यक्त केले. वाईकर सहस्रबुद्धे ग्रंथ समितीतर्फे एक अल्पशी देणगीही त्यांनी दिली व आपलेपणाच्या भावनेचा प्रत्यय आणून दिला.
    समग्र सहरबुद्धे कुलवृत्तान्त लिहिण्याचा दुसरा प्रयत्न जुन्नरच्या कै. हरी अप्पाजी सहस्रबुद्धे वकील यांनी केला. १९३१ साली केसरी वर्तमानपत्रातून सहस्रबुद्धे कुटुंबीयांना माहिती पाठविण्याची जाहीर विनंती त्यांनी केली. पोस्टाने पत्र पाठवून वैयक्तिक संपर्क साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. तिसरा प्रयत्न कोतवडे निवासी कै. सखारामपंत सहस्रबुद्धे, धामेळवाडा यांनी केलेला असावा, असे दिसते. त्यांच्या देहावसानानंतर त्यांच्या घरी जपून ठेवलेल्या बाडातील वंशवृक्षांचे काही कागद त्यांचे नातू श्री. विनायक सुधाकर यांनी प्रस्तुत ग्रंथासाठी प्राप्त करून दिले. त्यात कोठे न जमणाऱ्या वंशावळी या नावाखाली काही वंशावळी दाखविणारा एक कागद आहे. त्यावरून वंशवृक्षाची जुळवाजुळव करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. चौथा प्रयत्न पुण्याच्या सौ. श्यामलाबाई सहस्रबुद्धे, कर्वेनगर, पुणे यांनी १९७५च्या सुमारास केलेला दिसतो. याचा निर्देश कै. सखारामपंत व कोतवड्याचे श्री. माधव नारायण सहस्रबुद्धे यांच्या पत्रव्यवहारावरून दिसतो. त्यांनी जमविलेल्या माहितीचे पुढे काय झाले ते कळले नाही. कै. हरी अप्पाजींचे यासंबंधीच्या माहितीचे बाड पुण्यास आलेल्या पानशेतच्या महापुरात वाहून गेल्याचे समजले.
    कुलग्रंथासाठी माहिती मिळविण्यात काय कष्ट पडतात, हे पूर्णपणे अनुभवल्यानंतर कालमान परिस्थितीनुसार काही कारणाने सर्व प्रयत्न सोडून द्यावे लागले तरी त्यांनी केलेल्या श्रमांसाठी कृतज्ञता व्यक्त करून प्रस्तुत ग्रंथाच्या जडण-घडणीचा भाग पुरा करू.
    आपल्या कुलग्रंथाच्या जडणघडणीचा थोडक्यात परामर्श घेतल्यानंतर ग्रंथाच्या अंतरंगाबद्दल जरासे जास्त तपशीलवार निवेदन करणे आवश्यक आहे, कारण तो समाजशास्त्र व विज्ञानशास्त्र यांच्या समन्वयाच्या प्रदीर्घ अभ्यासाचा परिपोष आहे. परंतु त्यापूर्वी, माहितीपत्रके जमा करताना कार्यकत्र्यांना ऐकाव्या लागलेल्या प्रश्नांचा थोडक्यात उत्तरादाखल परामर्श घेणे उचित होईल. ते सर्व प्रश्न कुलग्रंथाचे प्रयोजन काय या एकाच प्रश्नाच्या उत्तरात सामावले आहे.

    कुलवृत्तान्ताचे प्रयोजन:

    या सृष्टीचा फार मोठा भाग जीवयोनीने व्यापला आहे. या सर्व सजीवांच्या योनीत ‘माणूस’ हा केवळ एकच जीव सर्व जीवांपेक्षा वेगळा आहे. एका तत्त्वचिंतकाने माणसाची व्याख्या करताना A thinking animal अशी केली आहे. माणूस फक्त एकच असा जीव आहे, की तो आजच्या इतकीच उद्याचीही काळजी करतो. स्वत:चा विचार करताकरता कुलाचा विचार उत्पन्न होतो व त्याची परिणती इतिहास, समाज, संस्कृती इत्यादी संकल्पनेत होते. राष्ट्राचा किंवा एखाद्या संस्कृतीचा इतिहास, त्यातील कुलांच्या इतिहासाचाच बनलेला असतो. पशु-पक्षी व मानवजात यामध्ये आणखी एक महत्त्वाचा भेद आहे. जन्मदात्या माता-पितरांविषयी ज्ञान व चिरंतन स्मृती हा मानवाचा एक गुणधर्म आहे. पशु-पक्षी संगोपनकालापुरतेच माता-पितरांना ओळखतात. मनुष्यप्राणी मात्र अनेक मार्गांनी आपल्या पूर्वजांची स्मृती कायम ठेवण्याच्या खटाटोपात असलेला दिसतो. रोजच्या ब्रह्मतर्पणाच्या निमित्ताने ऋषी व पितरांना अघ्र्य देऊन त्यांची स्मृती कायम ठेवण्यापासून तो आपल्या पितरांच्या नावे शिष्यवृत्त्या, पारितोषिके देणे, आपल्या राहात्या वास्तूला त्यांची नावे देणे इत्यादी असे कालमानापरत्वे अनेक उपाय पूर्वजांच्या स्मृती ठेवण्यासाठी सर्वत्र व सर्वकाळ केलेले दिसतात. या विचारधारेतूनच आपल्या घराण्याचे पूर्ववृत्त, पूर्वपरंपरा पुढील पिढ्यांकरिता चिरस्थायी व्हावी, या प्रधान हेतूने कुलवृत्तान्त प्रसिद्ध करण्याची परंपरा सुशिक्षित, सुसंस्कृत घराण्यांतून दृढ झालेली अनुभवास येते. प्रत्येक कुलवृत्तान्ताचे स्थान मुख्यत: घराण्यांच्या किंवा कुटुंबीयांच्या दफ्तरीच राहावयास हवे. राष्ट्राचा इतिहास हा त्यातील कुलांच्या इतिहासात सामावलेला असतो. यामुळे सत्य व विस्तृत कुलेतिहास जितके होतील तितके अवश्य झाले पाहिजेत. अशा अनेक कुलवृत्तान्तांचे एकत्र समीक्षण केले, तर आपल्या राष्ट्रीय, सामाजिक, सांस्कृतिक इतिहासाचे संगतवार व सर्वंकष ज्ञान होण्यास खात्रीने मदत होईल, यात शंका नाही. कुलवृत्तान्ताचे कालदृष्ट्या साधारण दोन भाग पडतात, एक ऐतिहासिक काळातील माहितीचा व दुसरा वर्तमान पिढीचा. ऐतिहासिक काळातील माहितीच्या प्रसिद्धीकरणाने राष्ट्रीय इतिहास व संबंधित सामाजिक परिवर्तने जाणण्याचे एक साधन निर्माण होते, तर चालू पिढीतील माहितीमुळे सर्व कुलबंधूंना एकमेकांचा परिचय होऊन व्यावहारिक दृष्टीनेसुद्धा एक आपलेपणा निर्माण होतो व कुल आणि समाज संघटनेस मदत होते.
    कुलवृत्तान्तांच्या सामाजिक पूर्वपीठिकांचा विचार करताना मानववंशशास्त्र (Anthropology), भूविज्ञान (Geology), समाजशास्त्र (Sociology), राज्यशास्त्र (Political Science), नागरिकशास्त्र (Civics) अशा अनेक शास्त्रांचा अन्योन्यसंबंध आहे, हे लक्षात येते. समाजशास्त्राप्रमाणे सामाजिक प्रगतीची/ स्थूलमानाने चार स्थित्यंतरे मानण्यात आली आहेत. पहिला टप्पा हंटिंग स्टेज, दुसरा टप्पा नोमॅडिक स्टेज, तिसरा टप्पा अ‍ॅग्रिकल्चर स्टेज व चौथा टप्पा इंडस्ट्रिअल स्टेज. मानवशास्त्र व समाजशास्त्र यांचा अभ्यास करताना प्रत्येक वंशाची हकीगत व त्याची कुळकथा, त्याची परिस्थिती व प्रगती यासंबंधीची माहिती अभ्यासकांना मिळणे जरूर आहे. त्या माहितीनुरूप अनेक प्रकारची अनुमाने करता येतील व पुढील काळात त्यापासून मार्गदर्शन होईल. सांप्रत आपण चौथ्या टप्प्यातून जात आहोत. अशावेळी आपल्या सुशिक्षित, सुसंस्कृत घराण्यातून एकत्र आलेली माहिती पुढील काळासाठी उपयोगी पडावी. वर उद्धृत केलेल्या चौथ्या टप्प्यात आकडे संख्याशास्त्राचे, `स्टॅटिस्टिकल’ अभ्यासाचे महत्त्व वाढत आहे. चित्तपावन समाजाचे आता जवळजवळ ११२ कुलवृत्तान्त प्रसिद्ध झाले आहेत. त्या सर्वांचा एकत्र अभ्यास केला, तर समाजशास्त्रदृष्ट्या महत्त्वाची माहिती पुढे येईल. गेल्या काही वर्षांत प्रसिद्ध झालेल्या चित्तपावनांच्या काही कुलगंधांचा कुटुंबनियोजन आणि आरोग्य यादृष्टीने प्रत्येक वयोगटातील संख्यांचे विश्लेषण करता येईल. त्यावरून समाजातील स्त्री-पुरुषांचे प्रमाण, त्यांच्या जन्मदरांचे प्रमाण, लोकसंख्येचे वयोगटाप्रमाणे वर्गीकरण, शिक्षण, स्त्री शिक्षण, व्यवसाय, परदेशगमन, सांस्कृतिक-सामाजिक माहिती या सा आचार-विचारातील परिवर्तन इत्यादी अनेक गोष्टींची माहित, त्या त्या ज्ञातीसंबंधाने मिळेल अशी सांख्यिकी एकत्र मिळण्याचे एक प्रमुख साधन म्हणून या सर्व प्रसिद्ध झालेल्या कुलवत्तान्ताकडे पाहावेच लागेल.
    एकंदर समाजाच्या दोन-तीन टक्के नागरिकांसंबंधी हे काम आहे, असे म्हणून या कामाविषयी अनादर दाखविण्यात हशील नाही. मूलभूत स्वरूपाचे काम थोड्या लोकांनी केले असले, तरी समाजशास्त्रीय दृष्टीने ते महत्त्वाचे मानावयास हवे. अनुकरण हा एक मानवी स्वभाव आहे. समाजातील इतर अनेक ज्ञातीतही याविषयी जागृती होत असून मावळंकर, सरदेसाई, कुलाबकर, खटावकर, इनामदार, सुळे-देशमुख, फिरोदिया अशी काही उदाहरणे यासंबंधात देता येतील. हीच प्रक्रिया अधिक वेगाने सर्व ज्ञातींमध्ये होणे आवश्यक आहे.
    आपल्या कुलवृत्तान्तासाठी माहितीपत्रके गोळा करीत असताना ज्या अनेक प्रश्नांची सरबती ऐकावयास मिळे, त्यांचे स्वरूप याआधी उल्लेखिले आहे. या खटाटोपाचा निरुपयोगीपणा पटविण्यासाठी हेही सांगितले जाई, असे निरुपयोगी धंदे फक्त भारतातच चालत असतील. सुधारलेल्या जगतात अशा धंद्यांना कोणी विचारणारसुद्धा नाही. परंतु यासंबंधी एक उद्बोधक माहिती `पेंडसे कुलवृत्तान्त’ (१९९०) या एका कुलवृत्तान्तात प्रसिद्ध झाली आहे. पूर्ण विकसित देशात यासंबंधाने किती प्रचंड काम चालते, हे पाहणे जरूर आहे. केवळ एका अमेरिका देशातील उदाहरण मोठे बोलके आहे. तिचा संक्षेपाने उल्लेख पुढील माहितीरूपाने येथे देत आहोत.
    आर्थिक, धार्मिक, सामाजिक, स्वातंत्र्य समता मिळविण्यासाठी गेल्या तीन चार शतकात युरोपीय देशातून उत्तर अमेरिकेत स्थलांतर करण्याची लाट सुरू झाली. कालांतराने लोकवस्ती स्थिर होत गेली. तेव्हा “मी कोण? जुन्या जगाशी आणि जुन्या काळाशी माझा कसकसा पारंपारिक, वांशिक धागा आहे,” याविषयी औत्सुक्यपूर्ण ओढ, जिव्हाळा व आपुलकी अमेरिकन जगतात उत्तरोत्तर प्रगत होत गेली.
    अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांच्या साहाय्याने एखाद्या अत्यंत साधारण व्यक्तीसही आपल्या आई-वडिलांच्या त्रोटक माहितीवरून ४००/५०० वर्षांपूर्वीच्या, आपल्या घराण्याविषयीचा पूर्वेतिहास शोधणे आणि संग्रहित करणे अमेरिकेत शक्य झालेले आहे. The Church of Jesus Christ of latter-day Saints, Lake City, Utah, U.S.A., या चर्च संघटनेने आपल्या Genealogical Department चालविलेली Morman Family History Library Family History Library ही अत्यंत अद्वितीय सोय मानली जाते. Morman हा खिस्ती धर्मातील अनेक पंथापैकी एक पंथ आहे. या पंथाच्या माहितीची मूळ कागदपत्रे व साधने ७० कि.मी. दूर असलेल्या Little Cottonwood Canyon या पर्वताशेजारी जवळजवळ ४५० मीटर खोल बांधलेल्या Granite Mountain Records Vault मध्ये जतन केली आहेत. जगातील कोठल्याही देशात Morman बद्दल माहिती मिळेल, तेथे तेथे या संस्थेचे सभासद जातात व मायक्रोफिल्म्सच्या साहाय्याने संबंधित रेकॉर्ड जतन करून, मुख्य लायब्ररीकडे जतन करून ठेवण्यासाठी पाठवतात. कित्येकांना माहितीही नसेल, पण भारतातील बहुतेक क्षेत्रोपाध्याय व बडव्यांकडील जुन्याजुन्या नोंदीतून शेकडो वर्षांपासूनची जतन करून ठेवलेली माहिती या संग्रहालयाने मायक्रोफिल्म्सद्धारे प्राप्त केली आहे. अमेरिकेतील जवळजवळ ८०० लहानमोठ्या शहरांत अशी Genealogical माहिती पुरविणारी केंद्रे आहेत. त्या सर्व ठिकाणी संगणक यंत्रांच्या साहाय्याने सॉल्टलेक सिटीच्या मुख्य लायब्ररीत संग्रहित केलेली कोठलीही माहिती टेप्सद्वारे कोणासही पाहता येते.

    सांप्रतच्या कुलग्रंथाची उपलब्धी:

    कोणत्याही कुलग्रंथनिर्मितीचा उद्देश आपल्या मूळ ठिकाणाचा व मूळ पुरुषाचा शोध, कुटुंबाची कारणाकारणाने वेळोवेळी झालेली स्थानांतरे, पिढ्यानपिढ्या मूळ ठिकाणापासून किंवा मूळ कुटुंबाशी असणारे संबंध प्रस्थापित करून, पूर्वजांसह यच्चयावत कुटुंबीयांची माहिती, त्यांच्या प्रगतीचा आढावा, देश-कालमर्यादेच्या आकृतीबंधात होणारी धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय परिवर्तने, यासंबंधी संशोधन करणे व या सम्यक दृष्टिकोनाचा आलेख प्रसिद्ध करणे हा आहे. या दृष्टिकोनातून आपल्या कुलग्रंथाची उपलब्धी कितपत यशस्वी झाली आहे, वैगुण्य किंवा त्रुटी काय आहेत यांचा संक्षेपाने विचार `मनोगत’ या प्रकरणाच्या शेवटी प्रस्तुत करीत आहोत.
    वरील सर्व निकषांच्या माहितीचा कणा म्हणजे, कुलबंधूंनी पाठविलेली माहितीपत्रके. वर उद्धृत केल्याप्रमाणे चार शाखांकडून जवळजवळ ६५० माहितीपत्रके जमा झाल्यानंतर त्या सर्वांचा सखोल अभ्यास करण्यासाठी जी मनुष्यबळाची उभारणी व्हावयास पाहिजे होती, हौसेने पुढे येऊन या कामासाठी मन व वेळ देऊन कार्य करणारी सेवाभावी स्वयंसेवकांची निवड व्हावयास पाहिजे होती, ती दुर्दैवाने कधीच साध्य झाली नाही. सांप्रत तरुण पिढीच्या मागे तौलनिक श्रेष्ठत्वाच्या चढाओढीमुळे कामाचा व्याप खूपच वाढला आहे. घाईगर्दीच्या जीवनात त्यांना खरोखरीच वेळ व फारसे स्वास्थ्य मिळू शकत नाही. अशा परिस्थितीत कुलग्रंथनिर्मितीच्या काहीशा किचकट कामासाठी त्यांनी वेळ काढणे कठीणच आहे. आजकाल अनेक प्रभावी औषधे व वैद्यकीय साहाय्यामुळे सरासरी आयुष्यमान वाढलेले आहे. तेव्हा काही सेवानिवृत्त कुटुंबीयांनी तरी पुढे येऊन आपला काहीसा वेळ या कार्यासाठी द्यावा, असे आवाहन वेळोवेळी करूनसुद्धा दुर्दैवाने फारसे कोणी पुढे आले नाही व खूप मेहनत करून जमा केलेल्या या माहितीच्या खजिन्याचे काय करावे, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अशा वेळी पुणे शाखेचे डॉ. य. शि. सहस्रबुद्धे पुढे आले व त्यांनी आपण होऊन ही धुरा वाहाण्याचे ठरविल्यामुळे कुलग्रंथाचा गाडा मार्गस्थ झाला. जागतिक बँकेच्या कर्जावर मध्य प्रदेशातील अनेक धरणांच्या चाललेल्या कामाच्या पक्केपणासाठी निवडलेल्या जागतिक बँकेच्या पॅनेलचे सदस्य, कोकण रेल्वेच्या अनेक अवघड बोगद्यांबाबतचे सल्लागार, भूवैज्ञानिक संशोधनातील पीएच.डी. विद्याथ्र्यांचे मार्गदर्शक, इत्यादी अनेक कामांच्या व्यापातून कुलग्रंथाच्या अभ्यासाची धुरा कशी काय पार पडेल, अशी शंका प्रथम वाटत होती. परंतु वयाच्या पंचाहत्तरीच्या आसपास असलेल्या य. शि. यांनी ही जबाबदारी शेवटपर्यंत पार पाडली, कुलग्रंथाचा कच्चा खर्डा जसजसा आकार घेऊ लागला तसतसे ग्रंथछपाईच्या काळजीचे वेध सुरू झाले. कामाची एकंदर व्याप्ती व झालेल्या कामाचा आढावा लोकांपुढे मांडल्याशिवाय पैसे कसे जमा होणार, हे दिसताच मेहनतीने बांधलेल्या वंशवृक्षाचे मोठाल्या तक्त्यांमध्ये रूपांतर करून संबंधित विषयाचे फोटो, जुन्या सनदा, नकाशे इत्यादी वस्तूंच्या मांडणीने आकर्षित करणाऱ्या सभा त्यांनी घेतल्या. सांगली, नागपूर, मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, नाशिक येथे जाऊन व्याख्याने देऊन, पैसे जमविण्याच्या व्यापातही त्यांचा कार्यभाग मोठा राहिला. आज या ग्रंथाचे अंतरंग व स्वरूप हे त्यांच्या जवळजवळ एकट्याच्या दुर्दम्य उत्साहाचे व मेहनतीचे फळ आहे, हे कृतज्ञतापूर्वक नमूद करणे जरूर आहे.
    दोन गोत्रीयांच्या कुलग्रंथाच्या अभ्यासात प्रथम शांडिल्य व नित्युंदन असे माहितीपत्रकांचे वर्गीकरण केल्यानंतर लक्षात आले की, शांडिल्य गोत्रीयांची ५००, तर नित्युंदनाची १५० माहितीपत्रके जमा झाली. साहजिकच दोन्ही गोत्रांच्या वंशावळी, वैयक्तिक माहिती आदी विषय दोन स्वतंत्र भागातच देणे इष्ट झाले. त्यानुसार या ग्रंथात ते स्वतंत्रपणे दिले आहेत. परंतु जो भाग दोघांनाही बराचसा सारखा लागू पडेल, तो म्हणजे आपल्या सांस्कृतिक ओळखीचा. आपली ही ओळख देण्याच्या परंपरागत पद्धतीनुसार आपले वेद, शाखा-सूत्र, गोत्र, प्रवर यासंबंधी सर्वार्थाने परिपूर्ण व सहस्रबुद्धे कुटुंबीयांस असावी किंवा अशी माहिती मिळावी, अशी इच्छा कधी झाल्यास त्याबद्दल अनेक ग्रंथातून एकत्र केलेली माहिती त्यात फारसे सायास न पडता मिळावी, या हेतूने मनोगतानंतर या ग्रंथाचे पहिले प्रकरण `आपण कोण?’ या नावाने प्रस्तुत केले आहे. या भागात आपल्या वेदांसंबंधी माहिती, गोत्र-प्रवर या मूळ संकल्पनेत झालेले बदल, गोत्रप्रवर ऋषीची माहिती, आपल्या कुलस्वामी-कुलस्वामिनींची माहिती व त्यातील एकवाक्यता नसल्यामुळे दिसणारे फरक यासंबंधी विचार सादर केले आहेत. आजकाल कुलाचाराचे आचार काहीसे मागे पडलेले दिसतात. काही काळानंतर कदाचित वितरणातही जातील. तेव्हा त्यासंबंधीच्या नोंदी पुढील पिढ्यांकरिता घराण्यातील आवश्यक वाटल्याने सहस्रबुद्धे घराण्यातील कुलाचारांसंबधी बारीक तपशिलासह माहितीही या भागात दिली आहे.
    यानंतरचे प्रकरण येते ते आपल्या मूळ गावांसंबंधीची माहिती. शांडिल्य गोत्रीयांचे मूळ गाव कोतवडे, तर नित्युंदनापैकी आगरवायंगणी मूळगाव सांगणारे मूळचे वैशंपायन व मूळ गाव पंचनदी सांगणारे ते मूळचे पिंपळखरे अशी विभागणी प्रथमच या ग्रंथात प्रविष्ट केली आहे. मूळ गावांचा शास्त्रशुद्ध विचार करण्याच्या पद्धतीने जो भूविज्ञानदृष्ट्या अभ्यास झाला, त्यामुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीचे (Evolution of West Cost India) या विषयाच्या संशोधनात मूलभूत माहिती देणारे व त्याला मार्गदर्शक ठरणारे असे माहितीपूर्ण विवेचन या भागात दिले आहे. कोतवड्याचा भूविज्ञान नकाशा तयार केल्यानंतर तेथील भूवैज्ञानिक अभ्यासातून जवळजवळ ६०० वर्षांपूर्वी कोतवडे हे गाव समुद्राने व्यापलेले होते व मनुष्यवस्तीस योग्य जागा तयार झालेल्या काळात ५५० वर्षांपासून सुरुवात झाली असावी, हे सिद्ध करणारा कार्बन डेटिंग, पुराजीवशास्त्राच्या भक्कम पुराव्याने सिद्ध केल्यामुळे मूळ ठिकाणाचा शोध हा जो कुलग्रंथाचा एक मुख्य निकष आहे तो पूर्णपणे यशस्वी झाला. या ग्रंथाची ही उपलब्धी कुलग्रंथ लिहिण्याच्या इतिहासात प्रथमच होत आहे, हे विशेष आहे.

    वंशवृक्ष:

    विस्तार व मर्यादा’ हे या ग्रंथाचे यापुढील प्रकरण. व्यक्तिगत वंशावळीपासून संपूर्ण घराण्याचे १० ते २२ पिढ्या मागे नेणारे अनेक वंशवृक्ष तयार करण्याच्या कामातील अडचणी, त्यावर शोधलेले उपाय इत्यादी विषयांची शास्त्र निकषांवर अवलंबून आलेली उपलब्धी यांची चर्चा असून, कोतवडे गावच्या मूळच्या पाच-सहा वाड्यातून पुढे स्थानांतरित झालेली तीसच्यावर घराणी, शाखा, उपशाखा व त्यांचे मूळ ठिकाणांशी संबंध प्रस्थापित करण्यात आले असून गेल्या ३००/४०० वर्षांच्या सहस्रबुद्धे कुटुंबीयांच्या स्थानांतराचे एक संभाव्य विहंगम चित्र उभे करण्याचा एक प्रयत्न या प्रकरणात पाहावयास मिळेल. नित्युंदनांबाबतीत मूळच्या दोन गावापासून निरनिराळ्या घराणी/शाखांची बांधणी करण्यात आली असून, पिंपळखरे (सहस्रबुद्धे) हेसुद्धा मूळचे वैशंपायन (सहस्रबुद्धे) होते. याविषयी विश्वसनीय आख्यायिका व त्यांना पुरावा देणारी पंचनदी गावाच्या सरपंचाकडून आलेली खास शिवारांची माहिती या ग्रंथात प्रथमच नोंदली जात आहे. हीदेखील या ग्रंथाची एक उपलब्धी समजावी लागेल. भूवैज्ञानिकदृष्ट्या मागील कालमर्यादा सिद्ध केल्यानंतर शांडिल्य गोत्री गणपुल्यांचे सहमबुद्धे कसे व केव्हा झाले, हे माहितीपूर्ण विवेचन या भागात असून हा बदल आदिलशाही राजवटीत कोकण भागातील इ. स. १५५० सालच्या सुमारास झाल्याचे भक्कम पुरावे, केळ्ये घराण्यातील २२ पिढ्यांची वंशावळ व तेथील ८/९ पिढ्यांत निर्माण झालेल्या मतभेदात श्रीमंत माधवराव पेशव्यांच्या निवाडापत्राच्या साक्षीने सिद्ध करणारा पुरावा या ग्रंथात प्रथमच प्रविष्ट केला आहे. अशा त-हेने मूळ पुरुषांची ओळखही या अभ्यासाने सिद्ध झाली आहे.
    या पुढील प्रकरणात कोतवडे व आगरवायंगणी/पंचनदी या मूळ गावातून व वेळोवेळी तेथून बाहेर पडलेल्या कुटुंबांचे वंशवृक्ष, त्यातील गेल्या चार-पाच पिढ्यांतील स्त्री-पुरुषांच्या जन्म-मृत्यू तारखा, शिक्षण व व्यवसायासंबंधी माहिती, विवाहासंबंधी मुला-मुलींची माहिती, त्यांच्या उल्लेखनीय गोष्टींसंबंधित माहिती इत्यादींचा समावेश आहे. ज्या ज्या घराण्यात प्रसिद्ध व्यक्तींचा जन्म झाला, त्या व्यक्तींची थोडक्यात चरित्रे दिली आहेत. त्यात प. पू. बाबामहाराज सहस्रबुद्धे, प. पू. दासगणूमहाराज, पद्मश्री देशभक्त अण्णासाहेब सहस्रबुद्धे, सुप्रसिद्ध विद्वान समीक्षक डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे आदी थोर कुलबंधूंच्या कारकीर्दीचा परिचय यांचा समावेश आहे.
    व्यक्तिगत माहितीसंबंधी सर्वसाधारणपणे एक त्रुटी जाणवते, ती ही की, देशवृक्षातील वर्तमान पिढीच्या मागील तीन-चार पिढ्यांतील फारच थोड्या व्यक्तींची व्यक्तिगत माहिती जमा झाली. ६५० माहितीपत्रकातील प्रत्येक माहितीपत्रकात स्वत: पती-पत्नी, आई-वडील, सरासरीने प्रत्येकी दोन भाऊ-भावजया, प्रत्येकी दोन सुना-मुलगे व मुली व त्यांची प्रजा अशी कमीत कमी १२ जणांची माहिती अपेक्षित होती, जेणेकरून सर्व माहितीपत्रके मिळून निदान ४००० व्यक्तींची माहिती या प्रकरणात समाविष्ट करता आली असती. प्रत्येकाची माहिती हस्तलिखिताचे अर्धे पान तरी असावी, असे धरले तर व्यक्तिगत माहितीची दोन हजार पाने भरावयास पाहिजे होती. सध्याची माहिती केवळ दहा टक्के भरेल इतक्याच पानांची होईल. या परिस्थितीबाबत शोध घेताना असे दिसले की, या विषयासंबंधी एक प्रकारची सार्वत्रिक उदासीनता, आपल्याविषयी सांगण्यासारखे विशेष काय आहे, ही भावना, संकोच या मागे असावा. या त्रुटीचे आणखी एक कारण आहे, असे वाटते. कुळातील माहिती सद्यपरिस्थितीत केवळ तीन-चार वर्षांच्या संकलन काळातील आहे. सर्व घराण्यांपैकी वाईकर घराण्यातील प्रत्येक प्रतिनिधीची माहिती संकलित झाली आहे कारण १९१७ पासून त्या घराण्याच्या कोणी ना कोणी ती माहिती मिळवून जतन करून ठेवली आहे. अशा तNहेने दोन-तीन पिढ्यांतील प्रतिनिधींनी आपल्या पूर्वजांची माहिती जतन करून ती तीन आवृत्तींच्या रूपाने प्रसिद्ध केली आहे. उलट सांप्रतच्या समग्र सहस्रबुद्धे कुलग्रंथाची माहिती मिळविण्याचा काळ तीन-चार वर्षांचा आहे.
    कुलग्रंथाचे शेवटचे प्रकरण आहे आपल्या कुळाच्या सामाजिक, सांस्कृतिक वाटचालीच्या समालोचनाचे.
    स्येस टाका. एखाद्या देशाचा – राष्ट्राचा सामाजिक – सांस्कृतिक राजकीय इतिहास हा एक महासागर आहे, असे मानले तर ४००/५०० वर्षांच्या काळातील एखाद्या जमातीची एका कुळाची या विषयासंबंधी माहिती एखाद्या बिंदूइतकी लहान असणार आहे; परंतु एकंदर आढावा घेताना प्रत्येक घटकाचा आढावा त्या महासागराचा भाग आहे. या न्यायाने सहस्रबुद्धे कुलाच्या गेल्या ३००/३५० वर्षांत कायकाय सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक स्थित्यंतरे झाली याचा आढावा घेण्याचा प्रयत्न या समालोचनाच्या प्रकरणात प्रविष्ट आहे. वास्तविक आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या कुलवृत्तान्तांत असा प्रयत्न अगदी फारच थोड्या ग्रंथांतून केलेला दिसतो; परंतु एक तत्त्व व तत्त्वाची प्रत्यक्ष अंमलबजावणी यांचा एकत्र विचार करता या प्रकरणाची मांडणी कुटुंबांच्या वैयक्तिक माहितीतून वेगळी करून विषयानुसार एकत्र करून नोंदविण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.
    ग्रंथाचा पुढला भाग आहे निरनिराळ्या सूचींचा. यातील एक महत्त्वाची सूची म्हणजे सहस्रबुद्धे कुटुंबीयांची स्वतंत्र व्यवसाय सूची. या सूचीची कल्पना निघाली ती तरुण मुलांच्या अशा ग्रंथांच्या व्यावहारिक निरुपयोगाबद्दल वारंवार ऐकाव्या लागणाNया उद्गारातून. ही सूची परिपूर्ण नाही, याची कल्पना आहे. परंतु एकंदरीत उदासीनतेच्या वातावरणातून अंदाजे ४०० च्यावर सहस्रबुद्धे ७५ निरनिराळ्या स्वतंत्र व्यवसायात आहेत. याचे व्यवसाय-निहाय पत्ते यांचा संग्रह येथे पाहावयास मिळणार आहे. ही या ग्रंथाची आणखी एक उपलब्धी आहे.
    सहस्रबुद्धे घराण्यांतील पुरुषवर्गाची सूची, सहस्रबुद्ध्यांच्या सासुरवाशिणी व माहेरवाशिणी (त्यांच्या पूर्वाश्रमीच्या नावासहित) यांच्या याद्या या ग्रंथात आढळतील. प्रत्येक व्यक्तीच्या नावापुढील कंसातील आकडा, त्या त्या व्यक्तीची माहिती कोणत्या पानावर आहे, हे दर्शविणारा आहे. शेवटच्या सूचीत भारत व भारताबाहेर परदेशांत स्थायिक झालेल्या अशा अंदाजे १००० कुटुंबांच्या पोस्टाच्या पत्त्यांची यादी सापडेल. कुलग्रंथासाठी प्रथम माहिती संकलन व नंतर ग्रंथ छपाईसाठी अनेक कुलबंधूभगिनींनी वर्गणी/देणगी या स्वरूपात जी आर्थिक मदत वेळोवेळी केली, त्या सर्व मदतीचा आकडा या यादीतील त्या त्या नावापुढे कंसात दिला आहे. सहस्रबुद्धे कुलबंधू-भगिनी व्यतिरिक्त इतरांनी ज्या देणग्या दिल्या, त्यांची यादीही वेगळी प्रविष्ट करीत आहो. कोणत्याही रूपाने का होईना शेवटी प्रश्न असतो दामाजीपंतांचा! या एकंदर व्यवहारातील जमा-खर्चाचा हिशोब सक्षम व्यक्तीकडून तपासून घेतलेला ताळेबंद शेवटच्या सूचीत सादर केला आहे. अनेकांच्या मदतीने हा कुलवृत्तान्त प्रसिद्ध होत आहे. त्या सर्वांचे ऋण फिटणे कठीणच, पण निदान त्याबद्दलच्या कृतज्ञतेची नोंद करून हे मनोगत पूर्ण करीत आहे.
    जुने संपादक मंडळ

    ऋणनिर्देश :

    कुलग्रंथाचे संपादन करताना शेकडो कुटुंबीयांकडून माहितीपत्रके, विशेषत: याबाबतीत एक प्रकारची उदासीनता असताना जमा करणे, त्यांच्या अभ्यासाची पद्धतीक्रम ठरविणे, १० ते २२ पिढ्यांची अनेक वंशवृक्ष बनविणे, पूर्वजांच्या स्थानांतराची पाहणी करून घराणी, शाखा-उपशाखा ठरविणे, हे काम अति क्लिष्ट समजले जाते. या कामासाठी समविचारी, मेहनती, संघशक्तीची गरज असते. संबंधित कुटुंबातील काहीजण पुढे येतात व शेवटी ते काम पूर्ण करतात. काही बाबतीत साहजिकच अनेक विशेष अभ्यासकांची मदत घेणे आवश्यक असते. सहस्रबुद्धे कुलग्रंथासाठी अशी मदत ज्यांनी केली, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे एक पवित्र कर्तव्य ठरते. अशी कृतज्ञता व्यक्त करण्याकरता हे शेवटचे प्रकरण आहे.
    आपला जवळजवळ २२ पिढ्यांचा वंशवृक्ष तयार करीत असताना त्यास पूरक असा कागदोपत्री पुरावा जमा करण्यासाठी पुण्याच्या चित्तपावन ब्राह्मण संघाचे उपाध्यक्ष व शांडिल्य प्रतिष्ठानचे सचिव श्री. परशराम कमलाकर जोशी यांची फार मोठी मदत झाली. केळये-मजगाव येथील पिढ्यानपिढ्या जतन केलेल्या मोडीत लिहिलेल्या अनेक कागदांची भेंडोळी तपासून, त्यांचे बाळबोधीकरण करून गणपुल्यांचे सहस्रबुद्धे होण्याचा काळ आदीलशाही काळातील १७४०च्या सुमाराचा आहे हे सप्रमाण सिद्ध करून देण्यास अत्यंत महत्त्वाची मदत केली. यानंतरसुद्धा ज्या ज्या वेळी काही सल्लामसलतींची गरज पडली, त्या प्रत्येक वेळेस लगेच त्यांनी ती देऊन आमचा उत्साह वाढविला. त्यांना शतश: धन्यवाद.
    देवधर – दीक्षित कुलग्रंथाचे संकलक श्री. लक्ष्मण विश्वनाथ दीक्षित यांनी उतारवयात अनेक वेळा घरी येऊन आपलेपणाने आमच्या कामाची चौकशी करून वेळोवेळी सल्ला देऊन आमचा उत्साह द्विगुणीत केला. त्यांनाही मनापासून धन्यवाद.
    मुंबईस सहस्रबुद्धे कुटुंबीयांची संख्या मोठी आहे. मुंबई समितीने जवळजवळ १५० माहितीपत्रके जमा केली, परंतु त्यांच्या अभ्यासाचे काम काही कारणाने झाले नाही. अशा वेळी एक दिवस १७० माहितीपत्रके अचानकपणे हाताशी आली. चालू कामासही त्यापासून उशीर होऊ लागला. अशा वेळी नेरळचे श्री. गंगाधर रामचंद्र खेडकर, सेवानिवृत्त इलेक्ट्रिक इंजिनिअर वेस्टर्न रेल्वे हे आपण होऊन पुढे आले व एक महिन्याच्या आत प्रत्येक माहितीपत्रकातील वंशावळ लिहून काढून ती प्रत्येक माहितीपत्रकावर चिकटवून दिल्याने पुढील काम सोपे झाले. या त्यांच्या मदतीबद्दल त्यांना मन:पूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत.
    कार्याच्या सुरुवातीस प्रश्न उभा राहिला तो भारतभर पसरलेल्या सहस्रबुद्धे कुटुंबीयांशी संपर्क साधणे व पत्रव्यवहाराकरिता त्यांचे पत्ते माहीत होणे जरुरी होते. या कामी श्री. गणेशपंत व सौ. सरला सहस्रबुद्धे यांनी पाच-सहा हजार पत्रे भारतभर पसरलेल्या अनेक संस्थांच्या अधिकाऱ्यांना पाठवावयाचे ठरवले व अशी पत्रे पाठविली. असे पत्ते मिळाल्यानंतर कामास सुरुवात झाल्यानंतर जवळजवळ एक हजार सहस्रबुद्धे कुटुंबीयांनी कायम संपर्क ठेवणे अत्यंत गरजेचे होते. पत्ते मिळविण्याच्या कामात अनेकांनी माहिती देऊन मदत केली. विलेपार्ले येथील श्री. चंद्रकांत रामचंद्र परांजपे यांनी अनेक पत्ते सतत कळविण्याची मदत केली तर भडोच विद्यापीठातील ग्रंथपाल श्री. मेहता यांनी आपण होऊन गुजराथी वर्तमानपत्रात जाहिराती देऊन महाराष्ट्राबाहेरील अनेक कुटुंबीयांचे पत्ते मिळवून दिले. सरलाबाईंनी दरवर्षी रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी व पत्र पाठविण्यास सुरुवात केली. पत्रेच काय पण नुसते हजार पत्ते थोड्या अवकाशात पाकीटावर लिहिणे यासही मोठ्या मदतीची आवश्यकता होती. अशा वेळी श्री. गणेशपंत यांचे गुरुनानकदेव इंजिनिअरिंग कॉलेज, बीदर येथील सहकारी पुढे झाले. त्यांनी हे प्रचंड काम सतत दोन-तीन वर्षे सांभाळले. या सर्व लोकांच्याविषयी नावानिशी कृतज्ञता व्यक्त करणेच कठीण, म्हणून त्यांच्या अनमोल मदतीबद्दल, त्या सर्व सहकाऱ्यांविषयी मन:पूर्वक कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. कुलग्रंथाचा ५००/ ६०० पानांचा हस्तलिखित मसुदा पुरा झाला. शंभराचेवर वंशावळी तयार झाल्या. नकाशे, फोटो आदी तत्सम गोष्टी तयार झाल्यानंतर तो छापण्यासाठी खटपट सुरू झाली व प्रथम प्रथम या महागाईच्या काळात एकंदर खर्चाचा अंदाज बांधला गेला. त्यावेळी एक मोठी काळजी निर्माण झाली. अशाच एका गाठीभेटीत विषय पू. पू. बाबामहाराज सहसबुद्धे यांच्या भक्तमंडळीत सहजपणे बोलला गेला. गुरूंचा कुलग्रंथ होत आहे व तो आर्थिक अडचणीत आहे हे पाहून गुरुच्या कुलाचे ऋण अंशत: तरी आपल्या हातून फिटावे, या अत्यंत गुरुनिष्ठा भावनेतून महाराजांच्या जवळजवळ ३४/३५ भक्तांनी पैसे जमा करून पन्नास हजारांची भरघोस देणगी आमचे स्वाधीन केली. या एकरकमी देणगीमुळे आपल्या कुटुंबीयांत वर्गणी/देणगी विषयात एकदम रस निर्माण झाला. या सर्व गुरुभक्तांना शतशः धन्यवाद देऊन आपले एक परमपवित्र कर्तव्य करीत आहोत. त्या सर्व भक्तांची यादी स्वतंत्रपणे शेवटी देत आहोत.
    कुलग्रंथाच्या जडणघडणीला आकार येऊ लागला, परंतु आणखी काही माहितीची गरज भासू लागली. अशा वेळी मोडनिंबकर श्री. यशवंत नारायण, आगर वायंगणीचे श्री. गोविंद विष्णु, पुण्याचे कोथरुडचे मधुकर नरहर, मधुकर कृष्णाजी, सौ. स्नेहलता सहस्रबुद्धे आदी कुटुंबीयांनी पुढील पत्रव्यवहार करून योग्य ती माहिती मिळवून दिली देणग्या जमा करण्याच्या कामात मदत केली. अनेक बारीकसारीक पण महत्त्वाची माहिती दिली. अशा सर्व कुटुंबीयांचे मनापासून आभार प्रदर्शित करतो, पण तेही त्यांनी याबद्दल रागावू नये, अशी विनंती करून.
    कुलग्रंथासाठी देणगीसंबंधात आणखी काही सुखद घटना घडल्या. ग्रंथछपाईसाठी मदतीचे आवाहन, ज्यांनी माहितीपत्रके भरली त्यांनाच केले होते, परंतु कार्यकर्त्यांचे काही सुहृदयमित्र असे निघाले की, त्यांनी आपण होऊन देणगीरुपाने रकमा पाठविल्या. अशा सुहृदयांची यादी स्वतंत्र दिली आहे. सहस्रबुद्धे घराण्याशी काही संबंध नसताना जो आपलेपणा व उदारता त्यांनी दाखविली त्या सर्वांचे मनोमन आभार प्रविष्ट करीत आहोत. या ग्रंथातील अनेक नकाशे व फोटो यांचे स्कॅनिंग करून त्याची योग्य जागी मांडणी करण्याचे काम कु. गौरी रानडे, जी. डी. (आर्ट) एम. ए. यांनी मोठ्या हौसेने पुरे केले. त्यांचे मन:पूर्वक आभार.
    आपल्या रुढी-परंपरेप्रमाणे भाऊबीजेचा बहिणींचा हक्क असतो. कुलग्रंथाबाबतही ग्रंथछपाईची अडचण त्यांना सांगण्याचे प्रयोजनही नव्हते व तसे झालेही नाही परंतु शेवटी त्या सहस्रबुद्ध्यांच्या माहेरवाशिणी !! न सांगताही अडचण त्यांच्या लक्षात आली व त्यांनीही आपल्या माहेरच्या कुलप्रेमापोटी एक परम कर्तव्य मानून, अनपेक्षित अशा देणग्या पाठविल्या. त्यांचीही यादी ग्रंथात दिली आहे. त्या सर्वांचे कौतुकमिश्रीत मन:पूर्वक आभार मानीत आहोत. आपल्या घरात काही कार्य निघाले तर कुटुंबातील प्रत्येक घटक उत्साहाने कामास लागतो व शेवटी ते कार्य पार पडते, परंतु घरातल्या घरात आपण एकमेकांचे आभार मानीत नाही. तशी आपली परंपरा नाही. ज्या अनेक सहस्रबुद्धे मंडळींनी या सांघिक कार्यास हातभार लावला. त्यांचे व्यक्तिगत आभारप्रदर्शन करणे म्हणजे केवळ पोशाखीपणा वाटेल हे खरे आहे, परंतु काही काही घटना अशा घडतात की, त्या यशस्वी झाल्यानंतर आपण ‘शाब्बास’ म्हणून अगदी सहजपणे बोलून जातो. तशीच परिस्थिती या ग्रंथनिर्मितीच्या आनंद प्रसंगी अगदी सहज निर्माण होते. त्यात मुद्दाम किंवा पोशाखीपणाचा गंधसुद्धा नसतो. ४/४|| वर्षे कार्याच्या सुरुवातीस कार्याची ओळख करून देणे व पुढेपुढे कार्याचा आढावा घेऊन, सल्लामसलत घेणे जरूर होते, अशा सभा मुंबई समितीचे श्री. चिं. पु. सहस्रबुद्धे व त्यांचे सभासद मित्र यांच्या मदतीने तीन वेळा झाल्या. पुण्यास तीन सभा झाल्या. श्री. मुकुंद रामचंद्र यांच्या प्रोत्साहनाने ठाणे येथे, प्रा. अनिल सच्चिदानंद यांच्या सहकार्याने, सांगलीस, नागपूर समितीच्या मदतीने नागपुरास दोन सभा, श्री. श्रीकृष्ण गोपीनाथ यांचे खटपटीने कल्याण येथे, श्री. रामचंद्रपंत यांचे प्रोत्साहनाने नाशिक येथे, श्री. पुरुषोत्तम नारायण यांच्या खटपटीने डोंबिवली येथे उत्तम रीतीने पार पडल्या. अशा सभांचे आयोजन करणे हे एकट्या-दुकट्याचे काम होऊ शकत नाही. अनेकांची मदत अशा वेळी घ्यावे लागते. वरील सर्व सभाआयोजकांना शतश: धन्यवाद. केवळ त्यांच्यामुळे ठिकठिकाणी अनेक सहस्रबुद्धे कुटुंबीयांशी प्रत्यक्ष संपर्क साधून कासातील काही तटी लक्षात आणून देऊन कार्यास मोठा हातभार लागला. अशा सर्व संयोजक कुलबंधू-भगिनींचे मनापासून आभार मानीत आहोत.
    सर्व साधनसामग्रीची जुळवाजुळव झाल्यानंतर टाइपिंग सुरू करण्याआधी माहितीपत्रातील माहिती हस्तलिखितांशी पडताळून पाहणे, टाइप केलेले दोनदा तपासणे, इत्यादी कामांसाठी काम लवकर होण्यासाठी दोघादोघांच्या जोडीने हे मसुदे तपासणे करावयाचे वेळी अकोला, नागपूर, बिदर येथून पुण्यास आलेल्यांना मुक्काम करण्याकरता सोयीच्या जागेची आवश्यकता होती. अशा वेळी पुण्याच्या श्री. हेमंत हरि सहस्रबुद्धे यांनी आपला तीन खोल्यांचा नवा बांधलेला फ्लॅट या कामासाठी जवळजवळ चार महिने वापरावयास दिला. परगावातून येथे येऊन काम करण्याच्या जागीच राहण्याची व्यवस्था झाल्यामुळे वेळेची व पैशाची खूपच बचत झाली. या त्यांच्या अमोल मदतीबद्दल त्यांचे आम्ही ऋणी आहोत.
    दक्षिण कारवारकडील कुटुंबियांना फक्त कानडी समजते. त्यांचे संबंधीचा मजकूर मराठीव्यतिरिक्त कानडीतून द्यावा, असे ठरले. हे काम पुण्याच्या संयुक्त कर्नाटक संघाने करून दिले. याचे ‘मिरर ट्रेसिंग’चे काम बीदरचे श्री. मगेंद्र कावाडी यांनी केले. त्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत. नाशिकच्या श्री. दिनकर कृष्णाजी महाबळ यांनी नाशिक व त्रिंबकेश्वर
    खील क्षेत्रोपाध्यायांचेकडील लेख मिळवून दिले. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. मुद्रण प्रतीच्या शेवटच्या तपासणीच्या कामात श्री. दत्तात्रय रामचंद्र यांचा मोठा हातभार लागला.

    जुने संपादक मंडळ फोटो

    जुने संपादक मंडळ फोटो

    सिंहावलोकन:

    सन १९९८ ला सहस्रबुद्धे कुटुंबीयांचा कुलग्रंथ प्रकाशित झाला होता. त्या आधी सुद्धा कुलग्रंथ प्रकाशित करण्याचे प्रयत्न झाला होते. त्याची माहिती या साईटवर उपलब्ध आहेच. त्या वेळच्या संपादक मंडळाने अपुऱ्या साधनांवर मात करून अपार मेहनत कष्ट व चिकाटी दाखवून तो कुलग्रंथ पुरा केला व सर्व कोकणस्थ कुटुंबीयामध्ये आपला कुलग्रंथ हा एक आदर्श म्हणून गणला गेलेला आहे. जवळजवळ २२ पिढ्यांचा वंशवृक्ष तोसुद्धा कोतवड्यातील वाड्यांच्या रचनेप्रमाणे तयार करणे हे मोठे जिकरीचे काम समर्थ हातांनी पुरे केले होते. पूर्वीच्या संपादक मंडळाने ग्रंथात दिलेला ऋणनिर्देश आम्ही परत सर्वांच्या माहितीसाठी देत आहोत. आज सुमारे २९ वर्षांनी कुलबंधूंनी एकत्र येऊन या कुलग्रंथाचे संगणकीकरणाचे काम सुरू केले व अनेक अडीअडचणींवर मात करून हे संगणकीकरण पूर्ण करण्यात आले आहे. सर्व कुलबंधूंनी देखील एका आवाहनानंतर अल्पावधीत या कामाकरीता लागणारी सर्व रक्कम गोळा केली. हा कुलबंधूंचा प्रतिसाद उत्साहवर्धक होता.
    संगणकीकरण पूर्ण केल्यानंतरचे समाधान आहेच पण त्याचबरोबर पुढील कामे करण्याचा उत्साहदेखील आहे. आज हे सर्व संगणकीकरण पूर्ण झाल्यावर प्रत्येकाला आपापली वंशावळ अद्ययावत करता येणार आहे. तसेच काही नवीन माहिती उपलब्ध झाल्यास ती पण अंतर्भूत करता येईल. या संगणकीकरण करणाच्या कामी लोकांना प्रथम एकत्र आणून कुठेतरी या विषयाला चालना देण्याचे अत्यंत महत्त्वाचे व आवश्यक असे काम कुलबंधूंच्या कार्यकारिणीने केलेले आहे. तसेच न्यासाने देखील पुढाकार घेऊन हे काम तडीस नेण्याचे व मध्यंतरीच्या काळात थोडेसे थंडावलेले काम जोमाने पुढे नेण्याचे ठरवले आहे. कुलबंधूंचे संमेलन हे नोव्हेंबर २०२१ मध्ये घेण्याचे ठरवले असून त्यालासुद्धा असाच प्रतिसाद मिळेल याची खात्री आहे. एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ या न्यायाने आपण हे काम असेच पुढे न्यायचे आहे.