श्री. अनिल सहस्रबुद्धे
सांगली येथे चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये प्राध्यापक असतानाच श्री. अनिल सहस्रबुद्धे यांना समाजकार्याचीही खूप आवड होती. श्री. भैयाजी काणे ह्यांनी स्थापलेल्या पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान ह्या संस्थेशी त्यांचा खूपच संबंध आला त्यांच्या योजनेप्रमाणे मणीपूर, नागालँड मधील गरीब मुलांना शिक्षणासाठी सांगली येथे आणत. त्यानिमित्ताने सरांनी खूप वेळा पूर्वोत्तर प्रदेशांना भेट दिली.
तेथील अडचणींशी ते खूप परिचित झाले. मुलांना शिक्षणासाठी एकतर लांबवर चालावे लागायचे, नाहीतर शिक्षण नाहीच. ही गोष्ट साधारण ८५ ते ९० सालातली आहे.
त्यावेळी मणिपूर इंफाळ जवळील चुराचांदपूर गावात ते गेले असताना तेथील शैक्षणिक अडचण व त्यातच तेथील लहान मुलांचे ड्रग ॲडिक्शन मोठया प्रमाणावर आढळले. जवळच्या खेडेगावातील मुलांकरिता शाळेची आवश्यकता होती.
त्यांच्या प्रयत्नाचे फळ म्हणून त्यांच्या हस्ते २००८ मध्ये ‘ foundation Stone ‘ लावण्यात आला. आता शाळा ६वी पर्यंत असून २१५ विद्यार्थी संख्या आहे. दिवसेंदिवस त्यात प्रगती होते आहे.
त्यांना आणखी एका विषयात रुची होती. काश्मीर प्रश्नाविषयी त्यांचा खूप मोठा अभ्यास होता. त्यांनी कित्येक अतिरेकी संघटनांशी काश्मीर मुद्द्यावर चर्चा केली होती. जम्मु येथील ‘अंडा सेल ‘ (जेल मधील Hard Core अतिरेकी ठेवायची कोठडी ) मध्ये त्यांनी अतिरेक्यांशी चर्चा केली. काश्मीर करिता काही विशेष योजना त्यांच्या मनात होती. पण पुढे सरकारी विसंवादामुळे ती योजना स्थगित करावी लागली.