प्रास्ताविक :- ऐतिहासिक विश्वासार्ह पुरावा सादर करणारे संदर्भ त्यामानाने कमी उपलब्ध झाले. त्यांपैकी कुलग्रंथाच्या दृष्टीने जे काही महत्त्वाचे संदर्भ उपलब्ध झाले ते असे :
(अ) केळ्ये – मजगाव येथील शांडिल्य गोत्री श्री. भालचंद्र विष्णु सहस्रबुद्धे यांच्या संग्रहातून मिळालेले श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी इसवी सन १७७६ व १७७७ मध्ये दिलेल्या तीन निवाडा पत्राच्या अस्सल प्रतींवरून झेरॉक्स केलेली, मूळ मोडी लिपीत लिहिलेली व पुण्याच्या श्री. प. क. जोशी यांनी बाळबोधीतून करून दिलेली तीन निवाडा-पत्रे व त्यांचे मराठी तर्जुमे.
(ब) भाजेकर सहस्रबुद्धे यांना इसवी सन १७३१ साली श्रीमंत राजे शाहू छत्रपती स्वामी यांनी दिलेली मावळ प्रांतातील जमिनीची २ इनामपत्रे.
(क) इसवी सन १७९० साली श्री. आपाजी गणेश सहसबुद्धे यांना मिरज संस्थानाधिपतींनी महाजनकीची दिलेली सनद आणि ज्यामुळे सहस्रबुद्धे यांचे महाजन झाले त्या मूळ सनदेची झेरॉक्स कॉपी त्याच्या बाळबोधी भाषांतरासह.
(ड) इसवी सन १८३८ मध्ये सांगलीच्या राजे श्री चिंतामणराव पांडुरंग यांनी श्री. गोपाळ भास्कर सहस्रबुद्धे यास उगार या गावी जमीन बक्षीस दिल्याचे आज्ञापत्र.
(ई) पिंपळखरे सहस्रबुद्धे यांच्या त्र्यंबकेश्वर क्षेत्रोपाध्याय यांच्याकडील नोंदी.
वरील पाचही मूळ मोडी लिपीत असलेल्या दस्ताऐवजांच्या झेरॉक्स प्रतीच्या नकला त्यांच्या बाळबोधी रूपांतरासह या प्रकरणात प्रविष्ट केल्या आहेत.
(फ) याव्यतिरिक्त वाईकर सहस्रबुद्धे या नागपूर येथील कै. श्रीराम अच्युत सहस्रबुद्धे यांनी १९९० मध्ये सायक्लोस्टाइल पद्धतीने छापलेल्या कुलग्रंथात प्रसिद्ध केलेली इसवी सन १७५० ते १७८३ पर्यंतच्या काळातील श्रीमंत थोरले माधवराव व श्रीमंत सवाई माधवराव यांनी दिलेली वर्षासनांची सात आज्ञापत्रे. या आज्ञापत्रांचे मराठी रूपांतर वरील ग्रंथातील प्रकरण चारमध्ये समाविष्ट असून ती जशीच्या तशी येथे उद्धृत केली आहेत.
वरील सर्व अस्सल पुराव्यांपैकी कुलग्रंथाच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचे पुरावे, केळये-मजगावच्या वर (अ) कलमाखाली उद्धृत केलेल्या चार सनदांत आहेत. या चारही सनदांतून एकत्रित केलेला गोषवारा समजुतीच्या सुलभपणासाठी येथे देत आहो.
आपाजी हरि, राघोबल्लाळ व कासी परशराम हे तीन चुलत भाऊ केळये-मजगाव वंशवृक्षातील मूळ पुरुष गणेश यांचा मुलगा कृष्ण गणेश यांच्यापासून आठव्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. वरील सनदेमध्ये आपल्या फिर्यादीची पूर्वपीठिका नोंदविताना जी माहिती झाली त्याप्रमाणे मूळ पुरुषाचे मुलगे श्री. कृष्णाजी गणेश, शांडिल्य गोत्री, सहस्रबुद्धे यांना पातशहा यांनी विशाळगड व महिपतगड अमलाखालील काही भाग इनाम करून दिला. कोकणातील आदिलशाहीचा अम्मल सामान्यत: १४९० ते १६८६ असा मानला जातो. वरील दोन सनदा श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांच्या कार्यकाळातील इ.स. १७८६च्या आहेत. या काळात पेशवे किंवा करवीरकर यांच्या सत्ता काही वेळी एकमेकांत फिरत असत. वरील दोन्ही सनदा विशाळगड व महिपतगड या दोन्ही भागातील देशमुखी कायम करण्यासंबंधी आज्ञापत्रे आहेत. या माहितीवरून एक गोष्ट सिद्ध होते की, मूळ पुरुष कृष्ण गणेश सहस्रबुद्धे यास देसाई- देशमुखी वतने आदिलशहाच्या काळात दिली गेलेली आहेत. ती वतने तशीच आठ पिढ्या चालत आली. या दोन्ही सनदा इ.स. १७७७ च्या आहेत. साधारणपणे २५ वर्षांची एक पिढी मानली जाते. या हिशेबाने कृष्ण गणेश (देसाई) सहस्रबुद्ध याचा कार्यकाल इ. स. १५७७ च्या आसपास असावा. म्हणजेच सहस्रबुद्धे हे उपनाव त्याआधीपासून असावयास पाहिजे